Categories

वसु बारस आणि धनत्रयोदशी

वसु बारस आणि धनत्रयोदशी

दीपावली हा शब्द दीप आणि आवली म्हणजे ओळ, रांग या दोन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजेच दिवाळी हा दिव्यांचा, तेजाचा सण आहे. या दिवसापासून आपण तुळशी जवळ ग्रामदैवता जवळ, देवा जवळ पणत्या लावण्यास सुरूवात करतो.

वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचे वासरू, पाडस होय. हे एक नैमित्तिक व्रत आहे दीपावलीचे. नावातच जसे आपल्याला लक्षात येते आहे त्या प्रमाणे हा गाय आणि तिचे पाडस यांचा सन्मान, पूजन करण्याचा सण. हिंदूंनी बैल पोळा हा सण वेगळा आखलेला आहे आणि दिवाळीत वसु बारस आहे. बारस म्हणजे बारावा दिवस. द्वादशी होय. आज गाईची वासरा सहित पूजा करायची असते.

भगवान श्रीकृष्ण, श्रीगुरूदेव दत्त हे गाईशी कसे जोडले गेलेले आहेत हे आपण सगळे जाणतोच. गाईचे गोमुत्र हे अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. गाईचे जे पंचगव्य घेतले जाते ते सुद्धा अत्यंत आरोग्यदायी असते. गाय जवळ असल्यास एक सकारात्मक उर्जा आपल्या आसपास असते. आपल्या अनेक सणांमध्ये अनेक गोपनीय गोष्टी दडल्या आहेत. सांकेतिक अर्थ आहेत. या व्रतामधून हेही दिसते की हिंदू संस्कृती प्रत्येक सणामध्ये विविध पशुंचा किती आठवणीने सन्मान करते.

या दिवशी गाईचे वासरा सहित पूजन करावे. तिचे पाय धुवावे, अर्घ्य द्यावे, स्नान घालावे. हळदी-कुंकू वहावे. नैवेद्य दाखवावा. गाईच्या विविध अंगांना स्पर्श करून न्यास करावा. अशीच पूजा वासराची पण करावी. दिवा अगरबत्ती ओवाळावी. आज केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा. गाईला प्रदक्षिणा करावी. गाईला आपल्या उन्नतीची प्रार्थना करावी. अशी हि पुजा आहे.

धनत्रयोदशी:

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी[1] म्हणतात.

धनत्रयोदशीबद्दल एक कथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे मानतात. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

सर्वांना शुभेच्छा.

फेसबुक पेज लाईक करा…. https://m.facebook.com/home.php

धन्यवाद……. !